इथेनॉलच्या वाढीव दरांना केंद्रीय मंत्रिंमंडळाची मंजुरी

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाअंतर्गत ऊसाच्या वेगवेगळ्या कच्च्या मालापासून तयार केलेल्या इथेनॉलच्या वाढीव दरांना केंद्रीय मंत्रिंमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मंजुरी दिली आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना ही माहिती दिली. क श्रेणीतल्या मळीपासून तयार केलेल्या इथेनॉलचा दर प्रती लिटर ४६ रूपये ६६ पैशांवरून ४९ रूपये ४१ पैसे केला आहे. तर अ श्रेणीतल्या मळीपासून तयार केलेल्या मळीपासून ५९ रूपये ८ पैशांवरून ६० रूपये ७३ पैसे केला आहे. येत्या १ डिसेंबरपासून ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंतच्या आगामी साखर हंगामासाठी ही मंजुरी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. २०२५ ते २०३० या पाच वर्षात पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण २० टक्के करण्याचं लक्ष्य सरकारनं निश्चित केलं आहे. १० टक्के मिश्रणाचं लक्ष्य यंदा मे महिन्यातच गाठलं आहे, अशी माहिती पुरी यांनी दिली.  पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत पुढच्या वर्षापासून ई-ट्वेंटी इंधन पेट्रोलपंपावर उपलब्ध होण्याची शक्यता आहे, असं त्यांनी सांगितलं.