भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली असल्याचं प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचाराच्या भस्मासुरापासून देशाला दूर ठेवणं आवश्यक असून, भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागरुकता सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज नवी दिल्लीत बोलत होते.

सरकारच्या प्रत्येक विभागानं भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची इच्छाशक्ती दाखवली पाहिजे, असं मोदी म्हणाले. विश्‍वास आणि विश्‍वासार्हता ही विकसित राष्ट्र घडवण्‍याच्‍या गुरुकिल्ल्‍या आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं. यावर्षी ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत ‘भ्रष्टाचारमुक्त भारत विकसित राष्ट्रासाठी’ या संकल्पनेसह दक्षता जनजागृती सप्ताह पाळला जात आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी CVC ची नवीन तक्रार व्यवस्थापन प्रणालीचं पोर्टलची सुरुवात केली. या पोर्टलची कल्पना नागरिकांना त्यांच्या तक्रारींच्या स्थितीबाबत नियमित अपडेट्स् मिळावे आणि शेवटपर्यंत माहिती मिळत राहावी अशी आहे.

दक्षता जागरुकता सप्ताहाच्या संकल्पनेवर देशव्यापी निबंध स्पर्धेदरम्यान सर्वोत्कृष्ट निबंध लिहिणाऱ्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. सीव्हीसीनं प्रकाशित केलेल्या तीन पुस्तकांचंही यावेळी त्यांनी लोकार्पण केलं.