वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

 


मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र शासन ब्रिटनमधल्या वेस्टमिडलँड राज्याबरोबर गुंतवणूक विषयक सामंजस्य करार करणार आहे. वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी शिष्टमंडळासह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी परस्पर सहकार्यानं या दोन राज्यांमधले संबंध अधिक दृढ करण्याचा निर्णय घेतला. राज्यात भविष्यात निर्माण होणाऱ्या संधीचा फायदा घेण्यासाठी वेस्टमिडलँड मधल्या कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. वेस्टमिडलँड हे इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातलं मोठं केंद्र असून या सामंजस्य करारामुळे राज्यात अनेक गुंतवुणकीच्या संधी निर्माण होणार आहेत.  राज्य सरकार मुंबई-बर्मिंगहम विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, पर्यटन आणि पायाभूत सुविधांचा विकास या तीन क्षेत्रात महाराष्ट्र आणि वेस्टमिडलँड यांनी एकत्रित काम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.