मुंबईतून ५० किलो वजनाचे अंमली पदार्थ जप्त

 


मुंबई (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं काल मुंबईत छापा टाकून सुमारे ५० किलो वजनाचे अंमली पदार्थ पकडले. यासंदर्भात ६ जणांना अटक केली असून, त्यातला एकजण पूर्वी एअर इंडियात वैमानिक होता. नौदल गुप्तचर विभागाकडून खबर मिळाल्यावर गेल्या सोमवारी गुजरातमधे जामनगर इथं १० किलो वजनाचे अंमली पदार्थ पकडले होते. त्यात जामनगरच्या एकाला आणि मुंबईच्या ३ जणांना अटक झाली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे काल मुंबईच्या फोर्ट परिसरात कारवाई करण्यात आली आणि सुमारे ५० किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. यावेळी दोघांना अटक करण्यात आली. विभागाचे क्षेत्रीय संचालक अमित घावटे यांनी सांगितलं की, या एकूण साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे १२० कोटी रुपये आहे.