शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांचं दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान

 


मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवल्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यासंदर्भात आपलं म्हणणं ऐकून घ्यावं असं कॅव्हेट एकनाथ शिंदे यांनी दाखल केलं आहे. याप्रकरणी एक-दोन दिवसात सुनावणी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगानं परवा रात्री दिलेल्या अंतरिम आदेशात शिवसेना आणि धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह ठाकरे आणि शिंदे गटानं वापरू नये असा आदेश दिला होता. दोघांनाही पर्यायी निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नावं द्यायला आज दुपारपर्यंत मुदत दिली होती. यासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यापैकी एक नावं द्यावं अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्रिशुळ, उगवता सूर्य किंवा मशाल यापैकी एक निवडणूक चिन्हं द्यावं असंही त्यांनी आयोगाला सुचवलं आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हाबाबत अजून अधिकृत माहिती दिलेली नाही. बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना किंवा शिवसेना बाळासाहेबांची यापैकी एक नाव द्यावं, अशी विनंती एकनाथ शिंदेकडून करण्यात आल्याचं वृत्त आहे. त्रिशुल, उगवता सूर्य आणि गदा ही चिन्हं त्यांनी मागितल्याचंं कळतंय. मात्र त्याला दुजोरा मिळू शकलेला नाही.