निवडणूक आयोगाकडून आकाशवाणीवर ‘मतदाता जंक्शन’ या मतदार जागृती कार्यक्रमाचं होणार प्रसारण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोग आजपासून आकाशवाणीवर ‘मतदाता जंक्शन’ हा मतदार जागृती कार्यक्रम सादर करणार आहे. पुढचं वर्षभर चालणाऱ्या या कार्यक्रमाचं उद्घाटन नवी दिल्ली इथल्या आकाशवाणीच्या रंगभावनामध्ये आयोजित समारंभात, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पाण्डे आणि प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयांक अगरवाल यांच्या उपस्थितीत होईल. प्रत्येकी १५ मिनिटं कालावधीच्या ५२ भागांचा हा कार्यक्रम विविध भारतीच्या एफएम रेनबो, एफएम गोल्ड आणि आकाशवाणीच्या मुख्य केंद्रांवरून दर शुक्रवारी, प्रसारित केला जाईल.

मतदाता जंक्शन हा कार्यक्रम मराठी, हिंदी, संस्कृत, कोकणी सह देशभरातल्या एकूण २३ भाषांमध्ये प्रसारित होणार असून, यामध्ये मतदाता परिसंस्थेच्या सर्व पैलूंचा समावेश असेल. प्रत्येक कार्यक्रम निवडणूक प्रक्रियेशी संबंधित संकल्पनेवर आधारित असेल. देशातल्या सर्व पात्र नागरिकांना, विशेषतः युवा आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आणि पूर्ण माहितीने निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहन देणं हे कार्यक्रमाच्या सर्व भागांचं उद्दिष्ट असेल.