नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसानग्रस्तांना तातडीच्या मदतीची रक्कम ५ वरून १५ हजारावर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झाल्यावर दिली जाणारी तातडीच्या मदतीची रक्कम ५ हजारावरून १५ हजारापर्यंत वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. सततच्या पावसामुळे नुकसान झाल्यावर ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झालं तर पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची घोषणाही त्यांनी आज केली.

अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीच्या मुद्यांवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी विविध विभागांच्या मदतीने सर्वंकष धोरण जाहीर करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. 

राज्यात सरासरीपेक्षा १२१ टक्के अधिक पाऊस झाला. त्यामुळे १८ लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन बाधित झाली आहे. ऑगस्टमध्ये ८६ हजार हेक्टरपेक्षा अधिक जमिनीचं नुकसान झालं. याठिकाणी पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

विमा नुकसान भरपाईचे अर्ज बँकेत जमा करता येतील अशी घोषणाही त्यांनी केली. नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५०,०००/- प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरु केलं जाईल.

गोगलगाय आणि बोंड अळीमुळे झालेलं नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे केले जातील आणि नुकसान भरपाई दिली जाईल, असं ते म्हणाले.  बाधितांना सरकारने यापूर्वीच मदत जाहीर केली आहे. तसाच NDRF चे निकष बदलण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आढावा घेत आहेत, असं ते म्हणाले.

नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारा मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अँपचा वापर करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

राज्यातील पुरस्थितीला हवामान बदल कारणीभूत आहे. राज्यातील हवामानाचा अचूक अंदाज वर्तवता यावा यासाठी राज्यातील स्वयंचलित हवामान केंद्राची संख्या वाढवण्याची घोषणा त्यांनी केली.

राज्यातील शेतीत पिकांमध्ये वैविध्य वाढवणं, सेंद्रिय शेती आणि जैविक शेतीला प्राधान्य देणे, कृषी विद्यापीठ बळकट करण्याची घोषणाही त्यांनी केली. राज्यात ज्या ज्या क्षेत्रांमध्ये दरड कोसळणे किंवा वारंवार पूर येणे इत्यादी आपत्तीप्रवण क्षेत्र आहे तिथे लोकांना सतत धोकादायक स्थितीमध्ये रहावे लागते. अशा क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण निश्चित करण्यात येत आहे. यामुळे होणारी संभाव्य जिवित हानी मोठ्या प्रमाणावर टाळता येईल, असं त्यांनी सांगितलं.