सीमेवरील तैनात सैनिकांसाठी डिजिटल तिरंगा राखी पाठविण्याचे आवाहन

 

मुंबई : देशात सध्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही वेगवेगळे कार्यक्रम /उपक्रम साजरे केले जात आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून, सीमेवरील तैनात सैनिकांना; डिजिटल तिरंगा राखी पाठवण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे.

राज्यात सध्या स्वराज्य महोत्सवाचे आयोजन सुरू आहे. या दरम्यान, दि 11 ऑगस्ट रोजीच्या, रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून, डिजिटल तिरंगा राखी ही संकल्पना पुढे आली आहे. या डिजिटल राख्या ऑनलाइन पद्धतीने पाठवता येतील, असे सांस्कृतिक कार्य विभागाने स्पष्ट केले आहे.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या mahaamrut.org या संकेतस्थळावरील मुखपृष्ठावर असणाऱ्या, “डिजिटल राखी” यावर क्लिक केल्यानंतर ही राखी पाठवता येणार आहे. सीमेवरील सैनिकांसाठी, महाराष्ट्रातील महिला भगीनी “डिजिटल तिरंगा राखी”, एक फॉर्म भरून पाठवू शकतील. संकेतस्थळावरील डिजिटल राखी येथे क्लिक केल्यानंतर, एक अर्ज दिसेल. त्या अर्जामध्ये स्वतःचे, गावचे नाव, मोबाईल नंबर आणि डिजिटल तिरंगा राखी पाठवायची आहे. अशा प्रकारे प्राप्त झालेल्या डिजिटल तिरंगा राख्या सीमेवरील सैनिकांसाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात येतील. देशभक्तीचा आणि भारतीय संस्कृतीचा उत्कृष्ट मिलाफ असणारी ही संकल्पना मोठ्या उत्साहात महाराष्ट्रातील भगिनींनी राबवावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात आले आहे.