राज्याच्या अनेक भागांत पावसाची पुन्हा दमदार हजेरी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या अनेक भागांत पावसानं पुन्हा  दमदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात  मधून मधून पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. पालघर जिल्ह्याच्या काही भागात पाऊस सुरु आहे. डहाणू, कोसबाड भागात मुसळधार पाऊस पडत आहे. वर्धा जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आर्वी अमरावती राज्य मार्गावर कौंडण्यपूर इथल्या पुलावरून पाणी वाहू लागल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे बेंबळा नदी प्रकल्पाची पाणी पातळी वाढली आहे. आज सकाळी धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले असून नदी पात्रात  पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वाशीम जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून नदी-नाल्यांना पूर आला आहे आणि अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पांगरी ते अमानी या मुख्य रस्त्यावरच्या पुलावरून पाणी वाहत आल्यामुळे पाच गावांचा संपर्क तुटला आहे. पैनगंगा नदी पात्रात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी काठच्या  केकत उमरा, उकळी, पांगरखेडा, सोनखास आणि टणका या गावातल्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.

भंडारा जिल्ह्यात धनेगाव जंगल परिसरात काल मुसळधार पाऊस पडला. तुमसर तालुक्यातल्या धनेगाव, सोनेगाव या गावांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल रात्री वीज पुरवठा खंडित झाला होता. गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी उपविभागात कालपासून संततधार पाऊस सुरु आहे. त्यामळे काही मार्ग बंद झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातल्या पंचगंगा नदीसह सर्व नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला आहे. महाबळेश्वर, सातारा, जावळी, वाई , कराड, पाटण तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. कोयना आणि अन्य धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ होत आहे. कण्हेर धरणातून उद्या सकाळी पाण्याचा विसर्ग सुरु होणार आहे. त्यामुळे वेण्णा आणि कृष्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागानं आज सिंधुदुर्ग वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टीला आणि गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. तसंच नाशिक, सिंधुदुर्ग, विदर्भातले काही जिल्हे आणि दक्षिण मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.