जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ मध्ये दुरूस्ती केल्याच्या पार्श्वभुमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून काल स्थगित करण्यात आली.

राज्य शासनाने केलेल्या बदलांमुळे जिल्हा परिषदेच्या सदस्य पदांच्या जागांच्या संख्येत बदल झाला असून, सध्याची मतदार विभाग आणि निर्वाचक गणांची रचना; तसेच आरक्षणाची प्रक्रियादेखील स्थगित झाली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे. २८४ पंचायत समित्या आणि २५ जिल्हा परिषदांच्या अंतिम आरक्षणाची अधिसूचना जाहीर कऱण्यात येणार होती तसेच मतदार यादीही जाहीर कऱण्यात येणार होती. ही सर्व प्रक्रिया आहे त्या स्तरावर स्थगित करण्यात आली असल्याचं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने कळवले आहे.