किमान हमीभाव संदर्भात समिती स्थापन केल्याची केंद्रीय कृषी मंत्रालयाची अधिसूचना जारी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतमालाच्या हमीभावासंदर्भत शिफारशी करण्यासाठी केंद्रसरकारनं किमान आधारभूत किंमत समितीची स्थापना केली आहे. माजी कृषी सचिव संजय अग्रवाल समितीचे अध्यक्ष आहेत. यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत असेल, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं त्याची अधिसूचना जारी केली आहे. या समितीमध्ये नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांच्यासह सी एस सी शेखर, सुखपाल सिंग, नवीन पी. सिंग आदी तज्ज्ञांचा समावेश आहे.  शेतकरी प्रतिनिधींमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते शेतकरी भारत भूषण त्यागी यांच्यासह  अन्य आठ सदस्यांचा समावेश आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा आणि त्यात पारदर्शकता असावी यासाठी समिती स्थापन करण्याबाबत आश्वासन दिलं होतं  त्या अनुषंगानं ही  समिती स्थापन करण्यात आली आहे.  ही समिती शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन किमान आधारभूत किमतींबाबत  निर्णय  घेण्याबरोबरच, सेंद्रिय शेती, पीक विविधता , सूक्ष्म सिंचन पद्धती याबाबतही अभ्यास करणार आहे. याशिवाय कृषी विज्ञान केंद्र आणि संशोधन विकास संस्थांना  माहिती आणि ज्ञान केंद्रे बनवण्यासाठी भरीव प्रयत्न करण्यात येणार आहेत.