महागाई, जीएसटी आणि सोनिया गांधी यांची ईडी चौकशीच्या मुद्यांवरुन संसदेत गदारोळ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महागाई, जीएसटी वाढ आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची ईडी चौकशीच्या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळं सुरुवातीला दोन्ही सभागृहाचं कामकाज काही काळ स्थगित करण्यात आलं.

कामकाज सल्लागार समितीनं ठरवल्यानंतर सरकार या मुद्द्यांवर संसदेत चर्चा करायला तयार असल्याचं संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केलं. कामकाज सुरू झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास घेण्यात आला. देशविरोधी मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरोधात केंद्र सरकारनं काय कारवाई केली असा प्रश्न राज्यसभेत विचारण्यात आला. त्यावर काही युट्युब चॅनेल, ट्विटर आणि फेसबुक खात्यांवर निर्बंध आणल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. 

आतापर्यंत ९४ युट्युब चॅनल, १९ सोशल मीडिया खाती आणि ७४७ लिंक बंद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. जीएसटी दरवाढ, अग्निपथ योजना आणि कोरोना लसीकरणासंदर्भात विरोधक नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांनी जीएसटी परिषदेच्या बैठकीत दरवाढीविरोधात आवाज का उठवला नाही, असा सवाल त्यांनी केला. अग्निपथ योजनेसंदर्भात चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.