विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातल्या इतर भागात ओला दुष्काळ जाहीर करा - अजित पवार यांची मागणी

 


मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातल्या इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळं झालेलं शेतजमीन आणि पिकांचे नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधीमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलावण्याची मागणीही त्यांनी केली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना पत्र लिहिलं आहे. २० जूनपासून सुरू असलेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या पेरण्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. काही ठिकाणी पावसाने जमिनी वाहुन गेल्या असून घराचीही मोठया प्रमाणावर पडझड झाली आहे. सततच्या पावसामुळे पंचनामे अजुनपर्यंत होऊ शकले नाहीत, असं त्यांनी या पत्रात लिहिलं आहे. या दोन्ही विभागामध्ये शेतकरी अडचणीत आहेत. त्यातच शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढतं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसंच आत्महत्या रोखण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन बोलवून शेतकऱ्यांच्या नुकसानीवर चर्चा करावी आणि त्यांना तत्काळ मदत जाहीर करण्याची मागणी अजित पवार यांनी केली.