ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जाविद यांचा राजीनामा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दोन्ही सदस्य पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातले महत्त्वाचे सदस्य असून, त्यांचा राजीनामा हा जॉन्सन यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो.

सुनाक यांनी जॉन्सन यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे, की सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय दुःखद असला, तरी अशा प्रकारे पदावर कायम राहण्यात आपल्याला स्वारस्य नाही. अनेक गैरव्यवहारांची मालिकाच झाल्यानंतर जॉन्सन यांची पदावर राहण्याची क्षमता संपली आहे, असं जाविद यांनी म्हटलं आहे.

दिवसभरातल्या राजकीय नाट्यानंतर सुनाक आणि जाविद यांनी राजीनामा दिला. नुकतेच निलंबित करण्यात आलेले खासदार ख्रिस पिंचर यांच्यावरील आरोपांच्या सरकारच्या हाताळणीबाबत एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाहीर मतप्रदर्शन केल्यानंतर सुनाक आणि जाविद यांनी राजीनामा दिला.