शिवसेना फुटीनंतरच्या दाखल विविध याचिकांवर येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरच्या सत्ता संघर्षादरम्यान दाखल विविध याचिकांवर येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, यासाठी सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांचं पीठ स्थापन करण्यात आलं आहे. रमण्णा यांच्याव्यतिरिक्त न्यायाधीश कृष्णा मुरारी आणि न्यायाधीश हिमा कोहली हे दोन न्यायाधीश पीठाचे सदस्य आहेत.

१६ आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नोटिसी विरोधात शिंदे गटानं दाखल केलेली याचिका, एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्याच्या राज्यपालांचा निर्णय, विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी अनुमती देण्याचा राज्यपालांचा निर्णय, विश्वासदर्शक ठरावाचे निर्देश देण्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आदेश, एकनाथ शिंदे यांचं विधिमंडळ गटनेतेपद कायम ठेवून अजय चौधरी यांची नियुक्ती रद्द करण्याचा विधानसभा अध्यक्षाचा निर्णय, तसंच शिंदे यांना गटनेते आणि भरत गोगावले यांना प्रतोदपदी निवडीला मान्यता देण्याच्या अध्यक्षाचा निर्णयाला शिवसेनेचं न्यायालयात विविध याचिका दाखल करुन आव्हान दिलं आहे. या सर्व याचिकांवर हे पीठ सुनावणी घेणार आहे.