राज्यात दहा कोटीहून अधिक लोकांनी घेतला शिवभोजन थाळी योजनेचा लाभ

 

मुंबई : राज्य शासनाच्या वतीने गरीब व गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या  शिवभोजन थाळी योजनेचा आजपर्यंत  दहा कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. ही योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत 10 कोटी 71 हजार 959 थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये 15 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2021 या काळात 2 कोटी 70 लाख 51 हजार 472  मोफत थाळ्यांचा समावेश आहे.राज्यात सद्यस्थितीत १५२८  शिवभोजन  केंद्र सुरू आहेत.

राज्यात शिवभोजन योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच कार्यरत शिवभोजन केंद्रांवर परिणामकारक नियंत्रण ठेवण्याकरिता राज्यातील सर्व शिवभोजन केंद्रांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे अनिवार्य केलेले आहे. शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व शिवभोजन केंद्रांच्या १०० मीटर परिघामध्ये जिओ फेन्सिंग सुविधाही सुरु आहे. त्यामुळे शिवभोजन केंद्रचालकांना शिवभोजन केंद्राच्या १०० मीटर परिघामध्येच शिवभोजन योजनेचे व्यवहार (Transactions) करता येतात.