देशात पुढच्या वर्षीपर्यंत १ हजार खेलो इंडिया केंद्रं उभारली जाणार - अनुराग ठाकूर

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशात साडेचारशे खेलो इंडिया केंद्र आहेत. पुढच्यावर्षीपर्यंत ही संख्या १ हजारापर्यंत वाढवण्याची घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नव्यानं साकारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाचं नामकरण खाशाबा जाधव क्रीडा संकुल असं करण्याचा समारंभ त्यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. भावी खेळाडू घडवण्यासाठी माजी खेळाडूंना वर्षाला ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. क्रीडा क्षेत्रात आवश्यक पायाभूत सुविधांवर भर दिल्यापासून भारतीय खेळाडूंची कामगिरी उंचावली आहे, विशेषत: दिव्यांग खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे, असं ते म्हणाले. केंद्र सरकारनं क्रीडाक्षेत्रासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे, राज्यांनीही अशा प्रकारे  तरतूद केली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठातलं क्रीडा संकुल 27 एकर परिसरात असून यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक ॲथलेटीक्स ट्रॅक, फुटबॉल, अस्ट्रोटर्फ टेनिस कोर्ट, हँडबॉल, खो-खो, कबड्डी, यासह टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, मुष्टीयुद्ध, जिमनॅस्टिक,  जलतरण तलाव, हॉकी स्टेडियम आदी सुविधा असणार आहेत.