अॅस्ट्रोसॅट अवकाश दुर्बिणीनं टिपली ५०० व्या कृष्णविवराची व्युत्पत्ती

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात तयार करण्यात आलेल्या अॅस्ट्रोसॅट या अवकाश दुर्बिणीनं ५०० व्या कृष्णविवराची व्युत्पत्ती टिपली आहे. अॅस्ट्रोसॅटमध्ये अल्ट्राव्हायोलेट, ऑप्टिकल आणि क्ष-किरणांच्या माध्यमातून अवकाशातल्या घडामोडी टिपल्या जातात. यात कॅडमियम झिंक टेल्युराइड इमेजर हे उपकरण सुद्धा आहे. यानेच या कृष्णविवराची व्युत्पत्ती टिपली आहे. ही अतिशय मोठी गोष्ट असून यातून मिळालेली माहिती जगासाठी उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया या उपकरणाचे प्रमुख तसंच आयुका आणि अशोका विद्यापीठातले प्राध्यापक दीपांकर भट्टाचार्य यांनी दिली आहे. आयआयटी मुंबईतले प्राध्यापक वरुण भालेराव पी.एचडीचे विद्यार्थी गौरव वराटकर, आणि अस्विन सुरेश यांचं या संशोधनात प्रमुख योगदान आहे. गेल्या साडे सहा वर्षांपासून हे उपकरण कृष्णविवर टिपतं आहे. कार्यान्वित झाल्यानंतर अवघ्या काही तासात यानं कृष्णविवराची व्युत्पत्ती टिपली होती.