७३ वर्षांनंतर भारतीय पुरुष बॅडमिंटन संघानं पटकावला थॉमस चषक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदा थॉमस चषकावर आपलं नाव कोरलं आहे. भारताने अंतिम सामन्यात 14 वेळा चषक जिंकणाऱ्या इंडोनेशियावर मात देत चषकावर आपलं नाव कोरले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. भारताने इंडोनेशियावर 3-0 असा विजय मिळवला. 

या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लक्ष्य सेन, सात्विकराज रँकीरेड्डी, चिराग शेट्टी, किदम्बी श्रीकांत, एम. आर. अर्जुन, ध्रुव कपिला आणि एच एस प्रणॉय हे ठरले. या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विजयी संघाचं कौतुक केलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंबरोबर दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांचं अभिनंदन केलं. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनीही थॉमस कप जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केलं आहे.  

या कामगिरीबद्दल क्रीडामंत्र्यांनी भारतीय बॅडमिंटन संघाला एक कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केलं आहे. तर हे ‘यश म्हणजे भारतीय बॅडमिंटनच्या सुवर्णयुगाची सुरुवात आहे‘ अशा शब्दात उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी संघाचं अभिनंदन केलं आहे.