आपली पावलं उद्योगाच्या आणि विकासाच्या दिशेनं असायला हवीत- नारायण राणे

 


मुंबई (वृत्तसंस्था) : आपली पावलं उद्योगाच्या आणि विकासाच्या दिशेनं असायला हवीत, असं मत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग विकास संस्था, "झेप उद्योगिनी" आणि "वी एमएसएमई" च्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय परिषद आणि व्यावसायिक प्रदर्शनाचं उद्घाटन आज मुंबईत राणे यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सातत्यानं रोजगार वाढवण्याचं, आत्मनिर्भर भारताचं आवाहन करतात. त्यानुसार उद्योजक घडवण्याचा, रोजगार निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एमएसएमई सगळीकडे पहिल्या क्रमांकावर असलं पाहिजे, असंही राणे म्हणाले.येत्या दोन वर्षात महाराष्ट्रात ३७ क्लष्टर उभारण्याची घोषणा त्यांनी केली. देशाच्या दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र १३व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरच्या माणसाचं उत्पन्नही वाढलं पाहिजे. उद्योग स्नेही वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत ६ कोटी ३० लाख उद्योग आणि ११ कोटी कामगार आहेत, अशी माहिती राणे यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र एमएसएमई अचिवर्स पत्रिकेचं प्रकाशनही राणे यांच्या हस्ते झालं.वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अध्यक्ष विजय कलंत्री, कार्यकारी संचालक रूपा नाईक, एमएसएमई महाराष्ट्रचे संचालक प्रशांत पार्लेवार, दुबईस्थित पेशवा हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक सचिन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.