राज्य शासनाचा पिडीलाईट इंडस्ट्रीजशी सामंजस्य करार; आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिक प्रशिक्षण
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना आता पिडीलाईट इंडस्ट्रीजच्यावतीने आधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाचा कौशल्य विकास विभाग आणि पिडीलाईट इंडस्ट्रीज दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला.
राज्याचे कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे, प्रधान सचिव मनीषा वर्मा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे संचालक दिगंबर दळवी आणि पिडीलाईट इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष डॉ. पी. के. शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांच्या मंत्रालयातील दालनात आज कराराबाबत सविस्तर चर्चा झाली. पिडीलाईट इंडस्ट्रीजचे अरुण उपाध्याय यांनी सविस्तर सादरीकरण करुन पिडीलाईट इंडस्ट्रीजच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. कारपेंटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, मैसन आणि इंटेरियर डेकोरेशन या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची खूप मागणी आहे, असे त्यांनी सांगितले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
यावर पिडीलाईट इंडस्ट्रीजने औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील विद्यार्थ्यांना रोजगारक्षम होण्यासाठी अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी सर्वेक्षण करावे. राज्यातील काही औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रशिक्षण द्यावे. त्यानंतर व्यापक स्वरूपात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी भविष्यातील मनुष्यबळ आहे. त्यांना आताच योग्य प्रशिक्षण दिल्यास भविष्यात त्यांच्याकडून चांगल्या दर्जाचे परिणाम येऊ शकतील. त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांना अधिक चांगले प्रशिक्षण देण्यासाठी औद्योगिक कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. टोपे यांनी केले.
हे सर्व प्रशिक्षण उपक्रम पिडीलाईट इंडस्ट्रीजच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी उपक्रमामधून केले जाणार आहे. पिडीलाईट इंडस्ट्रीजने यापूर्वी गुजरात आणि राजस्थान सरकार सोबत सामंजस्य करार केले आहेत. कारागिरांना प्रशिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे, असे उपाध्यक्ष डॉ. पी. के. शुक्ला यांनी सांगितले.
प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी महाराष्ट्र शासन आणि पिडीलाईट इंडस्ट्रीजच्या सहकार्याने राज्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक प्रशिक्षण मिळेल, असे सांगितले.
यावेळी कौशल्य विकास विभागाचे उपसचिव डॉ. नामदेव भोसले, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक योगेश पाटील, पिडीलाईट इंडस्ट्रीजचे संजीव सिन्हा, डॉ. प्रदीप गाडेकर, हर्षद देशपांडे, अरुण चमणकर, हिना शहा आदी उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.