महाराष्ट्रदिनी मुंबईत ‘महाराष्ट्र एम एस एम ई एक्सपो २०२२’चं आयोजन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : १ मे अर्थात महाराष्ट्रदिनी सूक्ष्म, लघू आणि  मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीनं मुंबईत ‘महाराष्ट्र एम एस एम ई एक्सपो २०२२’चं आयोजन करण्यात आलं आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं १ मे ते ३ मे दरम्यान हे प्रदर्शन आयोजित केलं असून केंद्रीय लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उदघाटन होणार आहे.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक उद्योजकांना नवीन व्यावसायिक संधींसह  सरकारसोबत व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होणार आहे. याशिवाय नवउद्योजकांना लघु-मध्यम उद्योग योजना, कॉर्पोरेट कंपन्यांसोबत व्हेन्डर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, मुद्रा कर्ज योजना, परदेशातील व्यावसायिक संधी, आयात-निर्यात या विषयावर मार्गदर्शन केलं जाणार आहे.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांमधल्या अनेक उद्योजकांच्या उत्पादनांना व्यासपीठ मिळू शकेल. ग्राहकांना देखील थेट उत्पादकांसोबत संवाद साधण्याची संधी या उपलब्ध होऊ शकेल.