देशाच्या भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी नागरिकांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रामनवमीच्या निमीत्तानं गुजरातमधल्या जुनागढ इथल्या उमिया माता मंदीराच्या १४व्या स्थापना दिनाच्या स्थापना सोहळ्याला प्रधानमंत्र्यांनी ऑनलाईन पद्धतीनं संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. आपल्या स्वार्थासाठी आपण मातृभूमीचं स्वार्थासाठी शोषण करू नये, नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आपण मातृभूमीचं जतन आणि संगोपन केलं पाहिजे असं ते म्हणाले. पोषणवर्धित आहाराचा अवलंब करून आपण लहान मुलांची विशेषतः, मुलींची काळजी घ्यायला हवी असंही आवाहन त्यांनी केलं. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमीत्त प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ तलाव निर्माण करावेत, यामुळे गांवांची भरभराट व्हायला मदत होईल असं ते म्हणाले. उमिया माता मंदीराच्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांसोबतच गरीबांना मोफत आरोग्य सेवा दिली जात असल्याबद्दल त्यांनी प्रशंसाही केली.