तृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी त्यांच्या गुरुंनी सहकार्य करावे – प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे

 

मुंबई : देशातील प्रत्येक नागरिकास मतदानाचा अधिकार असून तेवढाच अधिकार तृतीयपंथीय समाजाला पण आहे. मतदान प्रक्रियेत तृतीयपंथीयांनी संघटितपणे सहभाग घेतल्यास त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होईल. आजमितीस राज्याच्या मतदार यादीत केवळ 3 हजार 700 व्यक्तींनी तृतीयपंथीय म्हणून नोंदणी केली आहे. मतदार यादीत राज्यातील सर्व तृतीयपंथीय समाजाने नोंदणी करावी, यासाठी तृतीयपंथीयांच्या गुरुंनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी आज केले.

मुंबईतील भायखळा येथे तृतीयपंथीयांच्या गुरूंच्या वसाहतीत जाऊन मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी भेट दिली. यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपजिल्हाधिकारी माधव पाटील, तृतीयपंथीयांचे गुरू, मुंबई किन्नर ट्रस्ट, किन्नर मॉ संस्थेचे सदस्य आदी उपस्थित होते.

तृतीयपंथीयांचे प्रश्न, त्यांच्या समस्या भिन्न असून त्याबाबत राज्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना त्याची माहिती असायला हवी. यासाठी राज्यभरातील तृतीयपंथीयांचे गुरू, शासकीय अधिकारी, शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था यांची राज्यस्तरीय परिषद घेण्यासंदर्भात विचार सुरू आहे. तृतीयपंथीयांच्या विविध समस्यांचा अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल शासकीय अधिकाऱ्यांना एकत्रितपणे सादर करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकरिता फेलोशिप देण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे श्री.देशपांडे यांनी यावेळी सांगितले. आजच्या घडीला तृतीयपंथीयांची मतदार यादीतील नोंदणी अल्प असल्याने त्यांना त्यांचे अधिकार मिळण्यात अडचणी येत आहेत. महाराष्ट्रात जवळपास 10 लाख तृतीयपंथी असून या सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाल्यास त्यांना येत असलेल्या समस्या सहज दूर होऊ शकतील, असे मतही श्री.देशपांडे यांनी व्यक्त केले.

तृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत असून मुंबई शहरात त्यांच्या निवासाजवळ शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. ज्या तृतीयपंथीय व्यक्तींनी आपल्या नावाची नोंद तृतीयपंथी म्हणून केली नसेल, तर अशांनीही आपल्या मतदान कार्डात तृतीयपंथी म्हणून बदल करावा, असे आवाहनही श्री.देशपांडे यांनी यावेळी केले.

मुंबई जिल्हाधिकारी श्री. निवतकर यावेळी म्हणाले,  संपूर्ण राज्यात तृतीयपंथी हा वंचित घटक असून त्यांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त व्हावा, यासाठी सर्व तृतीयपंथीयांच्या नावाची नोंदणी मतदार यादीत असावी, याबाबतचे सर्वेक्षण सुरू आहे. या मतदान कार्डामुळे आपणास मतदानाच्या पवित्र अधिकाराबरोबर वेगवेगळ्या सोयीसुविधा मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी सर्व तृतीयपंथीयांनी मतदान कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे नोंदणी करावी, असे आवाहन श्री.निवतकर त्यांनी केले.