गावात न राहणाऱ्या तलाठ्यांना घरभाडेभत्ता न देण्याची बाळासाहेब थोरात यांची विधानसभेत घोषणा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपाच्या १२ निलंबित आमदारांचं निलंबन रद्द करण्याच्या विषयावरुन आज विधानसभेत गदारोळ झाला. त्यामुळे कामकाज अर्धा तास तहकूब करावं लागलं. नेमून दिलेल्या गावातच तलाठ्यांनी राहावं अशा स्पष्ट सूचना दिल्या जातील, आणि तरीही जे गावात राहणार नाहीत त्यांना घरभाडेभत्ता दिला जाणार नाही, अशी घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत केली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मुंबई-पुणे महामार्गासह सर्व महामार्गांवर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ठिकठिकाणी ट्रॉमा सेंटर उभारली जातील, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज सभागृहात सांगितलं. मुंबई उपनगरातल्या जमिनीच्या ८८४ नकाशांपैकी १०२ नकाशांमध्ये अवैध प्रकारे फेरफार झाले आहेत. याप्रकरणी संबंधित तपासयंत्रणांचा अहवाल हाती आल्यावर दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलं.