१६ जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा करण्याची पंतप्रधानांची घोषणा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्वातंत्र्याला १०० वर्ष पूर्ण होतील त्यावेळी देशाच्या प्रगतीत भारतीय स्टार्ट अप कंपन्यांचं योगदान महत्त्वपूर्ण असेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी काल भारतीय स्टार्टअप कंपन्यांबरोबर दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. दरवर्षी १६ जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा केला जाईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. देशाच्या जडणघडणीत स्टार्टअप्सचं महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधानांनी स्टार्टअप्स हा नवीन भारताचा कणा असेल, असं यावेळी नमूद केलं. २०२२ हे वर्ष स्टार्टअप कंपन्यांसाठी अनेक संधी उपलब्ध करून देणारं ठरेल. देशातील स्टार्टअप्ससाठी आता सुवर्णकाळ सुरू होत असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. हे दशक भारतीय तंत्रज्ञान दशक म्हणून ओळखले जाईल. कृषी, आरोग्य, अवकाश, उद्योग, सुरक्षा, वित्त तंत्रज्ञान आणि पर्यावरण अशा विविध क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्या या संवादात सहभागी झाल्या होत्या. दीडशेहून अधिक कंपन्यांनी पंतप्रधानांसमोर आपल्या संकल्पनांचे सादरीकरण केलं.