राज्यात उद्यापासून पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी,तर रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत पूर्ण संचारबंदी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉन या विषाणुचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य सरकारनं नवे निर्बंध लागू केले आहेत. येत्या १० जानेवारी म्हणजे उद्यापासून हे निर्बंध लागू होतील. यानुसार पहाटे पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत जमावबंदी, लागू केली आहे. या काळात पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही. रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावशक सेवा वगळता कोणालाही प्रवास करता येणार नाही. लग्नसमारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीलाच परवानगी असेल, तर अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येईल. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना कमाल ५० जण उपस्थित राहू शकतील. शाळा, महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. यात केवळ राज्यमंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या केवळ १० वी १२ वीच्या परीक्षा तसंच इतर सरकार शैक्षणिक विभागांकडून घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना नियोजित कृती कार्यक्रमांना अपवादात्मक स्थितीत परवानगी असणार आहे. जलतरण तलाव, व्यायाम शाळा, सौंदर्यप्रसाधनगृहं बंद राहतील. केशकर्तनालयं ५० टक्के क्षमतेनं चालू शकतील, मात्र कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचं पालन त्यांना करावं लागेल. मनोरंजन उद्यानं, प्राणीसंग्रहालय, वस्तुसंग्रहालयं, किल्ले, स्थानिक पर्यटन स्थळं बंद राहतील. मॉल्स, बाजार संकुलं यांना ५० टक्के क्षमतेनं परवानगी असेल. मात्र, त्यासाठी सरकारनं दिलेल्या नियमांचं पालन करावं लागेलं.