देशात आतापर्यंत देण्यात आल्या कोविड प्रतिबंधक लशीच्या १५० कोटींहून अधिक मात्रा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज कोरोना प्रतिबंधक लशीच्या १५० कोटींहून अधिक मात्रा देण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला. गेल्यावर्षी १६ जानेवारीला लसीकरण सुरू झाल्यापासून एक वर्षापेक्षा कमी कालावधीत ही कामगिरी साध्य झाली आहे. देशातल्या ९० टक्के जनतेला कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा मिळाली असून ६५ टक्के पात्र नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. गेल्यावर्षी २१ ऑक्टोबरला देशानं १०० कोटी मात्रांचा टप्पा गाठला होता. देशव्यापी लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून केंद्र सरकारकडून सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लशींचे मोफत वाटप करण्यात येत आहे. सरकारी लसीकरण केंद्रांवर सर्व नागरिकांना मोफत लशी दिल्या जात आहेत.