राज्यात काल ४१ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ४१ हजार ३२७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर ४० हजार ३८६ रुग्ण बरे झाले. राज्यात काल २९ कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातल्या ८ जणांना काल ओमायक्रॉन प्रकारच्या विषाणूचा संसर्ग झाल्याचं वृत्त असून हे सर्व जण पुणे जिल्ह्यातले आहे. राज्यात सध्या २ लाख ६५ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातले सर्वाधिक रुग्ण अनुक्रमे ठाणे, मुंबई आणि पुणे जिल्ह्यात आहेत. जवळपास २ आठवड्यांनंतर मुंबईत काल १० हजारापेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली. मुंबईत काल ५७ हजारांहून अधिक चाचण्यांमधून सुमारे ७ हजार ९०० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. तर २१ हजारांहून अधिक रुग्ण काल बरे झाले. मुंबईतल्या एकूण रुग्णांपैकी ८४ टक्के रुग्णांना कुठलीही लक्षणं नाहीत आणि ६८८ जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. मुंबईत काल ११ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला यातले १० जण ज्येष्ठ नागरिक होते. पुणे शहरात काल ५ हजार ३०० हून अधिक कोरोना बाधित आढळून आले. पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे अडीच हजार आणि पुणे जिल्ह्यात एकवीसशेहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. नागपूर शहरात सुमारे अठराशे तर जिल्ह्यात पावणे ५०० शे नवे रुग्ण आढळले. ठाणे शहरात १ हजार ८२५, जिल्ह्यात ७१२, नवी मुंबईत सुमारे अठराशे, पनवेलमध्ये सोळाशेहून अधिक कोरोनाबाधित एका दिवसात आढळले. नाशिक शहरातही सुमारे सतराशे आणि नाशिक जिल्ह्यात बाराशेहून अधिक कोरोना बाधितांची नोंद झाली.