संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्यावर अंत्य संस्कार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण दल प्रमूख जनरल बीपीन रावत यांना आज देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. आज सकाळी गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, माहिती प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि लष्कर, नौदल आणि वायुदलाच्या प्रमुखांनी जनरल रावत यांच्या पार्थिवावर त्यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली अर्पण केली. जनरल रावत शौर्य आणि साहसाचं प्रतिक होते. जनरल रावत यांचं इतक्या लवकर आपल्यातून निघून जाणं दुर्दैवी आहे. देशसेवेबद्दल त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील, असं गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी देखील जनरल रावत यांच्या पार्थिवावर श्रद्धांजली वाहिली. जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यावर आज संध्याकाळी ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. त्यांची अंतिम यात्रा दुपारी दोन वाजता त्यांच्या घरातून निघाली. काल जनरल रावत यांच्यासह 13 जणांचे पार्थीव तामिळनाडूच्या सुलुर इथून दिल्लीतल्या पालम विमानतळावर आणण्यात आले. काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी विमानतळावर श्रद्धांजली अर्पित केली. अनेक देशांनी या दुर्घटने बद्दल शोक व्यक्त केला आहे. श्रीलंकेचे लष्कर प्रमूख कमांडर शवेंद्र सिल्वा अंतिम संस्काराला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.