ओमायक्रॅानच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस आणि नवं वर्षानिमीत्त समारंभांचं आयोजन करू नये, डॉ. इक्बाल चहल यांच आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या ओमायक्रॅान या नव्या प्रकारानं बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ख्रिसमस आणि नव्या वर्षानिमीत्त समारंभांचं आयोजन करू नयेत, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल चहल यांनी केलं आहे. लग्नसमारंभ आणि अन्य कार्यक्रमात कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन होत असल्याचं सातत्यानं दिसून येत असल्यानं मुंबई पोलीसांनीही कार्यक्रमांमधल्या गर्दीवर निर्बंध घातले आहेत. यासंदर्भात मुंबई पोलीसांनी जारी केलेल्या आदेशानुसार बंद जागांमध्ये आयोजित केलेल्या सर्वप्रकारच्या कार्यक्रमांमध्ये क्षमतेच्या ५० टक्केच लोकांना उपस्थित राहायची परवानगी आहे, तर मोकळ्या जागांवर आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये क्षमतेच्या २५ टक्के लोकांनाच परवानगी असेल. यासोबत कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या नागरिकांचं पूर्ण लसीकरण झालेलं असणंही गरजेचं असणार आहे. कोणत्याही कार्यक्रमात एक हजारापेक्षा अधिक लोक उपस्थित राहणार असतील, तर त्याबाबत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला माहिती देणं बंधनकारक केलं आहे. मुंबई पोलीसांनी जारी केलेले आदेश लक्षात घेऊन, नागरिकांनी सहकार्य करावं आणि लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन चहल यांनी केलं आहे.