मनोरंजन उद्योग लवकरच १०० अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठेल, असा केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांना विश्वास

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या १० ते २० वर्षात मनोरंजन विभागानं मोठी वाढ पाहिली असून - मनोरंजन उद्योगाला भविष्यात चांगले दिवस आलेले दिसतील असा विश्वास माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी व्यक्त केला आहे. ते आज सी.आय.आय.च्या चित्रपट परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. एरव्हीपेक्षा लॉकडाऊनच्या काळात लोकांना अधिक चांगला आशय असलेल्या कलाकृती बघायला मिळाल्या. त्याची आता लोकांना सवय लागली आहे. गेल्या दीड वर्षात आशयदृष्ट्या गुणवत्ता सुधारली आहे. या सगळ्या बदललेल्या काळात लोक संधी शोधत आहेत. आता चित्रपटगृह सुरु झाली असून लोक चित्रपट पाहण्यासाठी जाऊ लागले आहेत, असं त्यांनी सांगितलं. सरकारला नियंत्रक म्हणून सौम्य आणि सुविधादाता म्हणून अधिक सक्रीय रहायला आवडेल, असं त्यांनी सांगितलं. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर व्यंपती यांनीही या परिषदेला संबोधित केलं. प्रसारमाध्यम आणि मनोरंजन उद्योगातल्या परिवर्तनाचा भाग बनण्यासाठी तसंच विविध आघाड्यांवर नव्या कल्पना राबवण्यासाठी लोकप्रसारक म्हणून प्रसारभारती मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे, असं त्यांनी सांगितलं.