ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा घेतला आढावा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या व्यवस्थेचा काल रात्री आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची होत असलेल्या तपासणीची पाहणी त्यांनी केली. त्यांच्यासोबत उपमहापौर सुहास वाडकर होते.परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी, स्कॅनिंग, विलगीकरण, आरटीपीसीआर चाचणी, प्रवाशांचं घोषणापत्र, प्रवाशांची पूर्वपीठिका, चाचणी अहवाल आदी काटेकोरपणे केलं जात आहे. एकही प्रवासी नजरेतून सुटणार नाही अशी व्यवस्था केली असून प्रवाशांसोबत पोलीसही आहेत. विमानतळावरच्या तपासणी केंद्रांची संख्या ५० वरून ८० पर्यंत वाढवली आहे. मुंबईत अद्याप ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तरीही सर्वांनी मास्क, निर्जंतुकीकरण आणि सुरक्षित अंतर हे नियम पाळावेत, असं आवाहन पेडणेकर यांनी केलं आहे.