भारतीय बनावटीची आयएनएस वेला ही स्कॉर्पीन-श्रेणीतली पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात तयार झालेली आयएनएस वेला ही स्कॉर्पीन-श्रेणीतली पाणबुडी, आज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईतल्या नौदल डॉकयार्ड इथं झालेल्या कार्यक्रमात नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांच्या उपस्थितीत आयएनएस वेला भारतीय नौदलात मोठ्या दिमाखात दाखल झाली. आयएनएस वेला भारत आणि फ्रान्स या दोन राष्ट्रांमधील वाढत्या सामरिक सामंजस्याचे प्रतिनिधित्व करते,असं नौदल प्रमुख अॅडमिरल सिंग यांनी यावेळी बोलताना सांगितलं.यामुळे नौदलाच्या सामर्थ्यात आणखीन भर पडेल,सध्याची वेगवान आणि गुंतागुंतीची सुरक्षा परिस्थिती पाहता, भारताच्या सागरी हितांचं रक्षण करण्यासाठी नौदलाची क्षमता वाढवण्यात आयएनएस वेला महत्त्वपूर्ण भूमिका बजावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कलवरी, खांदेरी आणि करंज नंतर आयएनएस वेला ही या मालिकेतली चौथी पाणबुडी आहे.या युद्धनौकेमुळे भारताच्या सामरिक सागरी मार्गांचं रक्षण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं वृद्धी होण्याची अपेक्षा आहे. माझगाव डॉक लिमिटेडनं फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपच्या सहकार्यानं या पाणबुडीची निर्मिती केली आहे.