परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा करण्याचं मंत्रिमंडळ बैठकीत सर्व सदस्यांचं एकमत

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या ओमिक्रॉन या विषाणुच्या प्रकाराचा संसर्ग रोखण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत रहावी जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल आणि संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल असं सांगितलं. जर परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा महाराष्ट्रातल्या इतर विमानतळांवर न उतरता देशात इतरत्र उतरले, आणि त्यानंतर देशांतर्गत विमान सेवेनं किंवा रस्ते आणि रेल्वे मार्गानं ते महाराष्ट्रात आले, तर त्यांची तपासणी कशी करणार हा सध्याचा प्रश्न आहे. याबाबत प्रधानमंत्र्यांना अवगत केलं जावं यावर सर्व सदस्यांनी एकमत नोंदवलं. देशभरातील आंतरराष्ट्रीय तसंच देशांतर्गत विमानसेवांनी प्रवाशांची माहिती नियमितपणे एकमेकांना दिल्यावर रुग्ण प्रवासी तसंच त्यांच्या संपर्कातील प्रवासी शोधणं सोपे जाईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.