१०० कोटी लसीकरण टप्पा पार केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांकडून देशवासीयांचे आभार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं आज कोविड प्रतिबंधक लशींचा १०० कोटी मात्रांचा टप्पा पार केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे आभार मानले. प्रधानमंत्र्यांनी डॉक्टर्स, परिचारिका, आणि या अभियानात सहभागी असलेल्या सर्वांच्या प्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हे भारताच्या विज्ञानाचं आणि १३० कोटी भारतीयांच्या एकत्रीत प्रयत्नांचं फलीत आहे, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे. त्या आधी प्रधानमंत्र्यांनी राम मनोहर लोहिया रुग्णालयात जाऊन वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले. सगळ्याच्या समर्पित प्रयत्नांमुळे  १०० कोटी मात्रांचं हे शिवधनुष्य पेलणं शक्य झालं, असं मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी देखील १०० कोटी मात्रांसाठी सर्वांचे आभार मानले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्त्वामुळे हे अवघड कार्य शक्य झालं, असं मांडवीय यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे. सक्षम नेतृत्त्व, शास्त्रज्ञांचं कौशल्य आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्यांचे अथक प्रयत्न या मुळेच हे अशक्य वाटणारं अभियान शक्य झालं, अशा शब्दात माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेबरायसेस यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, शास्त्रज्ञ, आरोग्य कर्मचारी आणि भारतीय जनतेचे अभिनंदन केले आहे.