राज्यातील पंधरा लाखांवर शेतकऱ्यांनी केले ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड

  जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी पद्म पुरस्काराकरिता शिफारसयोग्य प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना

मुंबई : स्वातंत्र्यदिनापासून सुरू झालेल्या ई-पीक पाहणी मोबाईल ॲप प्रकल्पास राज्यभरातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सात सप्टेंबर अखेर राज्यातील साडेपंधरा लाखांपेक्षा जास्त खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून त्यावर नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे पंधरा लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन ई-पीक पाहणी देखील नोंदविली असल्याची माहिती प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वाधिक शेतकरी खातेदारांची नोंदणी जळगाव जिल्ह्यात (१.१९ लाख) झाली आहे. द्वितीय क्रमांकावर धुळे (९४ हजार) तृतीय क्रमांकावर अमरावती (८१ हजार) जिल्हा आहे. सर्वाधिक नोंदणी नाशिक आणि अमरावती विभागात झाली आहे. त्या खालोखाल प्रतिसाद कोंकण आणि नागपूर विभागात दिसून येतो आहे.

ई-पीक पाहणी प्रकल्पाला शेतकरी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत असून क्षेत्रीय स्तरावर महसूल अधिकारी, तलाठी व मंडळ अधिकारी शेताचे बांधावर जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने पिकांच्या काढणी पूर्वी पीक पेरा ऑनलाईन भरणे आवश्यक असल्याने ग्रामीण भागात सध्या लगबग सुरु आहे, असे श्री. जगताप यांनी सांगितले. सर्व साखर कारखान्यातील ऊस नोंदणीसाठी सर्व कृषी अधिकारी व कर्मचारी यांनी ई -पीक पाहणीचा १०० टक्के वापर करण्याच्या सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकत्याच दिल्या आहेत, असेही श्री. जगताप यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या पीक पाहणी बाबतच्या सर्व अडचणी दूर होतील. त्यासाठी सर्व शेतकरी खातेदार यांनी ॲप डाऊनलोड करून वापरावे. आपल्या पिकाचा अक्षांश रेखांश सह फोटो अपलोड करून पीक पेरा ऑनलाईन नोंदवावा, असे आवाहनही श्री.जगताप यांनी केले आहे.

ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये पीक पाहणी कशी नोंदवावी?

 • गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी.

 • पीक पेरणीची माहिती सदरामध्ये जमिनीचा भूमापन क्र./स नं /गट क्रमांक निवडावा.

 • जमिनीचा गट क्रमांक निवडाल त्यावेळी तुमच्या जमिनीचे एकूण क्षेत्र व पोट खराबा याबाबत सर्व माहिती दर्शविली जाईल.

 • हंगाम निवडामध्ये खरीप किंवा संपूर्ण वर्ष या पैकी हंगाम निवडू शकता.

 • पीक पेरणीसाठी (लावणीचे) उपलब्ध क्षेत्र दर्शविले जाईल.

 • पिकांच्या वर्गामध्ये एक पीक पद्धती, मिश्र पीक, पॉलीहाउस पीक, शेडनेटहाउस पीक, पड क्षेत्र यापैकी योग्य पर्याय निवडावा.

 • जमीन मिळकतीमध्ये निर्भेळ पीकांची नोंद करण्यापूर्वी जमिनीत कायम पड क्षेत्र असल्यास, प्रथम कायम पड जमिनीची नोंदणी करावी.

 • पीकांचा वर्ग निर्भेळ पीक निवड केल्यानंतर निर्भेळ पीकाचा प्रकार पीक व फळपीक पर्याय दिसतील. त्यातील योग्य पर्याय निवडावा.

 • पीक पर्याय निवडून शेतातील पीकाचे नाव निवडून क्षेत्राची नोंद करावी. फळपीक पर्याय निवडल्यास फळ झाडांची संख्या व क्षेत्र नमूद करावे.

 • मिश्र पीक निवडल्यानंतर पिके आणि क्षेत्र नमूद करावे. मिश्र पिकाचे क्षेत्र नमूद करताना त्यातील घटक पिकाने व्यापलेल्या क्षेत्राचे प्रमाणात विभागून टाकावे. त्यातील घटक पिकांच्या क्षेत्राची बेरीज एकूण क्षेत्रापेक्षा जास्त होवू नये.

 • चालू हंगामामध्ये जमीन शेत पिकाखाली येत नसल्यास किंवा लागवड केली नसल्यास अशावेळी चालू पड क्षेत्र निवड करावे.

 • जल सिंचनाचे साधन पर्यायाखाली पिकांना पाणी देण्यासाठी ज्या सिंचन साधनाचा उपयोग करत आहात तो पर्याय निवडता येईल.

 • त्यानंतर सिंचन पद्धत निवडायची आहे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन किंवा अन्यप्रकारे यापैकी एक पर्याय निवडणे अपेक्षित आहे.

 • शेतकरी या ठिकाणी पीक पेरणी केलेला/लागवड केलेल्या पीकांचा दिनांक नमूद करतील.