कोरोनाची तिसरी लाट येऊच नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं - मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाची तिसरी लाट येऊच नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे, मात्र ती आलीच तर त्याची घातकता कमी व्हावी, यादृष्टीनं उपाययोजना आणि प्रयत्न सुरु आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कोविडची संभाव्य तिसरी लाट रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलानं आयोजित केलेल्या "माझा डॉक्टर" या ऑनलाईन परिषदेचं उद्धाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.

ऑक्सिजन, रुग्णशय्या, औषधं, व्हेंटिलेटर्स इत्यादी आरोग्य सुविधांच्या बाबतीत आपण कुठंही कमी नाही, पण या सगळ्या गोष्टी सतत वापरात असल्यानं त्यांची काळजी घेणं, यंत्रसामुग्रीची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्व रुग्णालयांनी ऑडिट करून घ्यावं असं त्यांनी सांगितलं. गेल्या अनुभवातून आपण काय शिकलो हे महत्वाचे आहे. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट आपल्यासाठी अधिक अडचणींची ठरली.

आपली ऑक्सिजनची गरज अचानक वाढली. इतर राज्यातून ऑक्सिजन मागवून घेऊन ही गरज भागवली पण आता आपल्या ऑक्सिजनच्या क्षमतेबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे. पावसाळा सुरु आहे. डेंग्यु, मलेरियाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

राज्यात अनेकजण घाईनं अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरताहेत. पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी, त्यांचं आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही ना याचा विचार सर्वांनीच करायला हवा. अगदी राजकारण्यांनीही विचार करायला हवा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं पण जीव जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

गेल्यावर्षी सणवारानंतर, गणेशोत्सवानंतर दुसरी जोरदार लाट आली. यावर्षी रुग्णसंख्या याआधीच वाढतांना दिसतेय. त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असं ते म्हणाले. लसीचे दोन्ही डोस घ्या. पण लस घेतली तरी सार्वजनिक ठिकाणी, चारचौघात वावरतांना काळजी घ्या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image