‘लोकराज्य’चा ऑगस्ट महिन्याचा अंक प्रकाशित

  ‘लोकराज्य’चा ऑगस्ट महिन्याचा अंक प्रकाशित

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’चा ऑगस्ट महिन्याचा अंक प्रकाशित झाला आहे.  महापुराच्या आपत्तीमध्ये राज्य शासनाने केलेले बचाव कार्य आणि बाधितांच्या पुनर्वसनासाठी राबवित असलेल्या उपाययोजनांचा आढावा या अंकात घेण्यात आला आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे लाखो कुटुंबे प्रभावित झाली. बाधित लोकांना स्थलांतर करावे लागले. या काळात राज्याच्या विविध विभागांनी राबविलेल्या योजना, लोकांना आपत्तीतून बाहेर काढण्याबरोबरच जनजीवन सुरळीत होण्यासाठी सुरू केलेले मदत आणि पुनर्वसनाचे कार्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच विविध विभागांच्या मंत्र्यांनी राज्यात केलेल्या पाहणी दौऱ्यांचा आढावा अंकात घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आपत्ती काळातील मदत आणि भविष्यातील उपाय यावर व्यक्त केलेले मनोगतही समाविष्ट करण्यात आले आहे. त्यांनी नागरिकांना दिलासा देतानाच प्रशासनाला दिलेल्या सूचना आणि शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचावी यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा या अंकात घेण्यात आला आहे.  याबरोबरच अंकात मंत्रिमंडळाने जनहीताच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयांची माहितीही करून देण्यात आली आहे. हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.