नियमित लसपुरवठ्यासाठी समन्वय साधणाऱ्या स्वतंत्र गटाची नियुक्ती करण्याची केंद्राची राज्यांना सूचना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लशींचा योग्य आणि वेळेवर पुरवठा होण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी लस उत्पादक आणि खासगी रुग्णालयं यांच्यात नियमित समन्वय साधणाऱ्या गटाची नियुक्ती करावी, असा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांची बैठक घेतली.

या महिन्यात देशभरात लशीच्या 12 कोटी मात्रा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळं लसीकरणाचा वेग वाढवता येणार आहे. नागरिकांना घराजवळ लसीकरण केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जावेत आणि नागरिकांना त्याबाबत माहिती करून दिली जावी, असा सल्लाही राजेश भूषण यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिला. नवीन लसीकरण केंद्रांसाठी शाळेच्या इमारती, वृद्धाश्रम, समाज कल्याण संघटनांची कार्यालये यांचा वापर करता येईल, असंही सुचवण्यात आलं आहे. कोरोना लस वाया जाण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी तातडीनं प्रयत्न करावेत, अशी सूचनाही केंद्रानं केली आहे.