केंद्र सरकारने परदेशातून लसी आयात करण्यासाठीचे राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे आरोग्यमंत्र्यांचं केंद्राला आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं परदेशातून कोविड प्रतिबंधक लसी आयात करण्यासाठीचं राष्ट्रीय धोरण तयार करावं अशी सूचना आपण केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केली असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते. अनेक राज्यांनी लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढल्या आहेत. मात्र परदेशी लस उत्पादक कंपन्या प्रत्येक राज्याला वेगवेगळे दर देत आहेत. याबाबतचं राष्ट्रीय धोरण ठरवलं गेलं, तर त्याचा राज्यांना फायदा होऊ शकेल, असं टोपे म्हणाले.

राज्यातले सुमारे २० ते २२ लाख नागरिक कोविड१९ प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेण्यासाठी प्रतिक्षेत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिलं आहे. ही बाब लक्षात घेऊन, लसींचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारनं योग्य नियोजन करावं असं सुचवलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्यभरात म्युकर मायकोसीस या आजाराचे पंधराशे रुग्ण आढळले आहे, आणि या आजाराच्या संसर्गाचं प्रमाणही वाढत असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यातला कोरोनारुग्णवाढीचा दर एक टक्क्याच्या खाली आला असल्याची माहिती त्यांनी दिली.