इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षात हमास आणि इस्रायलकडून हवाई हल्ले सुरुच

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात १० मे रोजी संघर्ष सुरू झाल्यापासून, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी काल चौथ्यांदा फोनवरून चर्चा केली. बायडन यांनी संघर्षाची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा असल्याचं नेतन्याहू यांना यावेळी सांगितलं.

बायडेन यांना युद्धबंदीचा मार्ग अपेक्षित असल्याचं व्हाईट हाऊसने दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. तर आपल्या नागरिकांसाठी शांतता पुनरस्थापित करेपर्यंत प्रयत्न चालू ठेवण्याचा इस्त्राईलचा निर्धार असल्याचं नेतन्याहू यांनी म्हटलं आहे.

अमेरिका आणि इस्रायल हे खंबीर सहयोगी असून अमेरिकेने आतापर्यंत संघर्षावरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या संयुक्त निवेदनाला विरोध केला आहे.

इस्त्राईल-पॅलेस्टाईन संघर्षाला ११ दिवस झाले असून हमासच्या अतिरेक्यांनी इस्राईलमध्ये रॉकेट हल्ले सुरू ठेवले आहेत.

इस्रायलकडून गाझा वर जेट हवाई हल्ले सुरू आहेत. गाझामध्ये आतापर्यंत किमान २२७ लोक ठार झाले असून यात किमान दीडशे अतिरेकी असल्याचा दावा इस्राईलने केला आहे. इस्राईलमध्ये १२ जण ठार झाले आहेत.