कोविड प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन उत्तम काम करत आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन करत असलेलं काम उत्तम असून, अजून जोमाचं काम करण्याची गरज असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज महाराष्ट्रासह दहा राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी, दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. उस्मानाबाद, जालना, लातूर, परभणी आणि बीडसह राज्यातल्या १७ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, या बैठकीत सहभागी झाले होते.

जिल्हा प्रशासनानं प्रत्यक्ष केलेलं कार्य, त्यांचे अनुभव, सूचना याचा विचार करुनच, सरकार प्रभावी उपाययोजना करत असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. लसीची एकही मात्रा वाया घालवू नये, गरीबांना वेळेत धान्य पुरवठा व्हावा, इतर जीवनावश्यक वस्तु मिळतील याकडे लक्ष द्यावं, औषधं, इंजेक्शनचा काळाबाजार रोखावा, आदी उपाययोजनांमुळे आपल्याला या महामारीला रोखता येईल, अशा सूचना पंतप्रधानांनी दिल्या.आपापल्या जिल्ह्याला विषाणू मुक्त करण्यात सर्व जिल्हाधिकारी नक्कीच यशस्वी होतील, असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.