तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावानं मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीत मुसळधार पाऊस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा मोठा प्रभाव मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई क्षेत्रात दिसून येतोय. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला हवामान विभागानं कालच ऑरेंज अॅलर्ट जारी केला होता. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईत काल रात्रीपासूनच जोरदार वारे वाहू लागले होते. आज सकाळपासून अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडतो आहे.

समुद्रात मोठ्या लाटा उसळत असून, मुंबईतल्या चौपाट्यांवर फिरायला पोलिसांनी प्रतिबंध केला आहे. सर्व चौपाट्यांवर ९३ लाइफ गार्ड तसंच आपत्कालीन स्थितीसाठी सातही अग्निशमन केंद्रांवर साधनसामग्रीसह जवान तैनात ठेले आहेत. वादळी वारा आणि पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचलं,  वादळी वारे आणि पावसामुळे १८२ झाडं कोसळल्याची माहिती प्रशासनं दिली.  

मुंबईच्या ट्रॉम्बे जेट्टीत ४० बोटींचं नुकसान झालं. वादळी वाऱ्यांचा जोर वाढल्यानं वरळी सीलिंकची वाहतूक पूर्णपणे बंद आहेत, तर काही ठिकाणी झाडं पडल्यानं रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४  विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना आवश्यक मनुष्यबळ आणि साधनसामुग्रीसह सज्ज राहायच्या सूचना आहेत. किनाऱ्यालगत आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना आवश्यकतेनुसार तात्पुरत्या निवासस्थानात हलवण्याचं नियोजनही केलं आहे.

सुरक्षेची उपाययोजना म्हणून दहिसर, मुलुंड आणि वांद्रे कुर्ला संकुलातल्या कोविड उपचार केंद्रातल्या ५८१ रुग्णांना इतरत्र हलवलं आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण बंद होतं. आता मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी लसीकरण केंद्र सुरु होतील अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य प्रशासनानं दिली.

दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेट वे ऑफ इंडिया इथं जाऊन तर आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीही, पालिका मुख्यालयातल्या आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा तसंच नियोजनाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

मुंबईत चक्रीवादळामुळे अतिवृष्टी होत असल्यानं सावधगिरी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज रात्री आठ वाजेपर्यंत सर्व  विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. पावसामुळे मध्य रेल्वेची मुंबई उपनगरीय सेवा २० ते २५ मीनिटं उशीरानं सुरु असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली.

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागानं मदत आणि बचावकार्याला सुरुवात केली आहे.  मुंबईत समुद्रात आठ नौटिकेल माइल्स इतक्या अंतरावर असलेल्या एका बोटीवर अडकलेल्या १३७ जणांची सुटका करण्यासाठी नौदलाची  आय एन एस कोलकाता ही युद्धनौका रवाना झाली आहे. याशिवाय बॉम्बे हाय परिसरातल्या तेल प्रकल्पातल्या २७३ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी आय एन एस कोची आणि आय एन एस तलवार या युद्धनौका ही तैनात केल्या आहेत.

Popular posts
नगरसेवक नामदेव ढाके यांच्या तहसिल आपल्या दारी मोफत उपक्रमात नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप  
Image
कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य
Image
घरीच कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांना चाचणीचे निष्कर्ष संबंधित वेबसाइट आणि स्थानिक प्रशासनाला कळविण्याचं राज्य सरकारचं आवाहन
Image
महिला आणि बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय विविध कार्यालयांना एकाच छताखाली आणण्याचा निर्णय
Image
लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Image