११ ते १४ एप्रील दरम्यान देशात लसीकरण महोत्सव, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ११ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत लसीकरण महोत्सवाची घोषणा केली आहे. ११ एप्रिलला महात्मा जोतीबा फुले यांची, तर १४ एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. देशातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे चर्चा केली. लसीकरण महोत्सवाच्या काळात युवकांनी पुढाकार घेत ज्येष्ठ नागरिक आणि इतर पात्र व्यक्तींना लसीकरणासाठी नावनोंदणी करण्यास मदत करावी, असं आवाहन मोदींनी यावेळी केलं. पंतप्रधानांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचाही आढावा घेतला. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांवर भर द्यावा, अशी सूचना मोदी यांनी यावेळी केली.

राज्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करणं आवश्यक असल्याचंही मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना सांगितलं. महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात आणि इतर काही राज्यांमध्ये संसर्ग वाढीचा वेग चिंताजनक असून पहिल्या लाटेपेक्षा ही परिस्थिती गंभीर असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं. काही राज्यांमधल्या लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढत असून प्रशासकीय पातळीवरही हलगर्जीपणा वाढत आहे, असे सांगत नाराजी व्यक्त केली. पुन्हा एकदा आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली असल्यानं चाचण्यांची संख्या वाढवा; बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध, तपासणी आणि उपचार या त्रिसूत्रीवर भर द्या, अशी सूचना पंतप्रधानांनी केली.