जीवमात्रांमध्ये परमात्म्याला पाहणे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : जडापासून चैतन्यापर्यंत, चलापासून अचलापर्यंत आणि मनुष्यमात्रांपासून पशुपक्ष्यांपर्यंत सर्वांमध्ये परमात्म्याला पाहणे हे भारतीय संस्कृतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सर्वच धर्म व पंथांनी पशुपक्ष्यांप्रति दया व करुणेची शिकवण दिली आहे असे सांगून ज्या लोकांनी कोरोना काळात पशुपक्षांची सेवा करून त्यांना जीवनदान दिले त्यांनी दैवी कार्य केले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
भायंदर (पूर्व) येथील जैसल पार्क चौपाटी कल्याण समिती या समाजसेवी संस्थेच्या वतीने कोरोना काळात पशुपक्ष्यांच्या अन्नपाणी व आरोग्याची काळजी घेणाऱ्या १५ जीवप्रेमी कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते आज राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
‘सेवा परमो धर्म:’ ही भारतातील संतांची शिकवण आहे. लॉकडाऊनमध्ये जनजीवन ठप्प झाले असताना मुक्या प्राण्यांच्या खाण्यापिण्याची तसेच आरोग्याची दैना झाली. या कठीण काळात ज्या लोकांनी पशुपक्ष्यांना अन्न, पाणी, दूध तसेच आजारी प्राण्यांच्या औषधोपचाराची व्यवस्था केली त्यांनी साक्षात ईशसेवा केली आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
करोडो रुपये कमवूनदेखील जो आनंद मिळत नाही तो आनंद एखाद्या मुक्या प्राण्याला पाणी वा अन्न देऊन मिळतो असे सांगून भारतातील लोकांमध्ये करुणाभाव असल्यामुळेच आपण इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचा मुकाबला अधिक चांगल्या पद्धतीने करू शकलो, असे राज्यपालांनी सांगितले.
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून गेले वर्षभर जैसल पार्क चौपाटी कल्याण समितीच्या जीवप्रेमी कार्यकर्त्यांनी पशुपक्ष्यांना अन्न, आजारी प्राण्यांवर उपचार, भटक्या प्राण्यांची नसबंदी तसेच मृत प्राण्यांवर अंत्यसंस्कार केल्याचे अध्यक्ष डॉ. मोतीलाल गुप्ता यांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी सक्षम फाउंडेशनचे अनुज सरावगी, सीए लीलाधर मोर, सीए नितेश कोठारी, सीए निकुंज भंगारिया, शुभांगी योगेश लाड, संतोष कुचेरिया, हेमलता सिंह, सीए पवन अग्रवाल, सीए अमित अग्रवाल, सुभाष चंद्र जांगिड़, देवकीनंदन मोदी, सुमित अग्रवाल, भरतलाल अग्रवाल, नरेंद्र गुप्ता, व मोतीलाल गुप्ता यांना मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे महासचिव निर्मल गुप्ता यांनी आभार मानले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.