अर्थसंकल्प रेल्वेच्या दृष्टीने ऐतहासिक असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे मत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेच्या पायाभूत प्रकल्प उभारणीसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून, हा अर्थसंकल्प रेल्वेच्या दृष्टीने ऐतहासिक आहे, असे मत केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

या भरीव तरतुदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात आणि आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यात रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही गोयल म्हणाले.२०२३ पर्यत शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण करणे, २०३० पर्यंत रेल्वेच्या संपूर्ण जाळ्यात शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करणे, रेल्वेचे अद्ययावतीकरण, तिकीट आरक्षण सेवा अधिक सुलभ करणे, ऑनलाईन माल वाहतूक शुल्क भरणा सुविधा उपलब्ध करणे अशी अनेक उद्दिष्ट साध्य करण्याची योजना रेल्वेने आखली आहे, असेही गोयल यांनी नमूद केले.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अद्याप रेल्वे सेवा पूर्वीप्रमाणे सुरू करण्याबाबत सर्व संबधित घटकांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. सध्या लसीकरण सुरू असले तरी धोका संपलेला नाही, त्यामुळे काळजी आणि प्रतिबंधात्मक उपाय राबवणे आवश्यक आहे, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.