मंत्रालयातल्या कार्यालयीन वेळा दोन पाळ्यांमधे, तसंच घरुन काम करण्यासंदर्भात तात्काळ नियोजन करा - मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातल्या कार्यालयीन वेळा दोन पाळ्यांमधे, तसंच घरुन काम करण्यासंदर्भात तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी काल मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. कार्यालयीन वेळांची १० ते ५ ही मानसिकता बदलण्याची गरज आहे असं मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीत बोलले होते, त्या अनुषंगानं महाराष्ट्रानं पुढाकार घेऊन नवीन कार्य संस्कृतीची सुरुवात करावी, असंही ते म्हणाले.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचं फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून प्राधान्यानं लसीकरण करावं याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले. मंत्रालयात बाहेरून येणाऱ्यांच्या प्रवेश निर्बंधांबाबत एक दोन दिवसांत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मंत्रालयात दररोज येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचं तापमान प्रवेशापूर्वी पाहावं, तसंच त्यांची अँटीजेन चाचणी करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, राज्यातल्या इतरही सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये योग्य ती जंतुनाशकं असावीत, वारंवार फवारणी करून स्वच्छता राहील, हेही पाहावं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.