स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात तीन अध्यासन केंद्र सुरु केली जाणार - उदय सामंत

 

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आणि शंकरराव चव्हाण असे तीन अध्यासन केंद्र सुरु केली जाणार आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल नांदेड मधे  'उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालय @ नांदेड' या अभिनव उपक्रमात ही माहिती दिली. प्रत्येक अध्यासन केंद्राला ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचं त्यांनी सांगितलं. याचबरोबर प्रबोधनकार अभ्यास केंद्रही विद्यापीठात सुरु होणार आहे, असं त्यांनी जाहीर केलं.

विद्यापीठ परिसरात गणितीयशास्त्र संकुलाच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण आणि उदय सामंत यांच्या हस्ते झालं. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि नंदीग्राम अॅग्रो कंपनी नांदेड यांच्यात हळद संशोधनाबाबत करारही करण्यात आला. नांदेडच्या श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्थेच्या यांत्रिकी विभागातल्या औद्योगिक यंत्रमानव निर्मिती प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन अशोक चव्हाण यांच्या हस्ते आणि उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं.