परवडणाऱ्या आणि पर्यावरणपूरक वाहतुकीवर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : परवडणारी आणि पर्यावरणपूरक वाहतूक हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे असे सांगताना विकासाची व्याख्या पर्यावरणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासन आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘कुलाबा कन्व्हर्सेशन’ या परिषदेत ऑनलाईन उद्घाटनपर भाषण करताना मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत हॅमबर्गच्या स्टेट कौन्सिलर आल्मट मॉलर, कॅलिफोर्नियाच्या ल्युटनंट गव्हर्नर एलिनाय कौनलकिस, थेरेसा शॉपर, मिनिस्टर ऑफ स्टेट, मिनिस्टरी ऑफ बेडेन-वुटमबर्ग, ख्राईस्टचर्चच्या मेयर लियान डॅलझिअल, न्यू साऊथ वेल्सच्या गव्हर्नर मार्गारेट बेझली यांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता.
या परिषदेत शहर, राज्य आणि नवी जागतिक व्यवस्था यावर चर्चा झाली. ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अक्षय माथूर यांनी प्रास्ताविक केले तर अध्यक्ष सुजय जोशी यांनी स्वागत केले.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, कोरोनाने सगळ्या जगाचे पॉझचे बटन दाबले असले तरी आपल्याला पुढील वाटचाल कशी करावी लागणार आहे तेही शिकविले आहे. कोरोनाने आपल्याला पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची ते शिकविले आहे. विकास सगळ्यांना हवा आहे पण कोरोना काळात आपल्याला विकासाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहण्याची संधी मिळाली आहे.
परवडणाऱ्या घरांविषयी आपण बोलतो, त्याचप्रमाणे आपल्याला आता परवडणाऱ्या आणि पर्यावरणपूरक अशा वाहतुकीविषयीही बोलावे लागेल. मुंबईत बेस्टच्या इलेक्ट्रिक बसेस, मेट्रो, त्याचप्रमाणे मुंबईच्या मधोमध ८०० एकर आरेचा भूभाग वनासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय याविषयी यावेळी माहिती देण्यात आली. कोरोनावर निश्चित औषध नसले तरी केवळ ऑक्सिजन देऊन अनेकांचे प्राण वाचले. त्यामुळे पुढील काळात ऑक्सिजनचे किती महत्त्व असणार आहे आणि पर्यावरणाची आपल्याला किती काळजी घ्यावी लागणार आहे ते समजले असल्याचेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून याठिकाणी समुद्रकिनारे, उद्याने, गुंफा, जंगल असूनदेखील मुंबईतील विकासाकडे सर्वांचे लक्ष असते, असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.